"Truth can be stated in a thousand different ways, yet each one can be true." - Swami Vivekanand

Friday, November 6, 2009

स्वदेशी उत्पादने

स्वदेशी चा विचार ही संकल्पना नवी नाही. परंतु अजूनही तिचा म्हणावा तसा प्रचार-प्रसार झालेला नाही. स्वदेशी म्हटल्यानंतर बर्याच जणांच्या डोळ्यासमोर निम्नस्तराची उत्पादने येतात उदा. दंतमंजन, खरखरीत साबण-अंगराग, गोमय उत्पादने वगैरे. स्वदेशी चा विचार हा वस्तूंपुरता मर्यादित नाही. 'स्वदेशी' म्हणजे 'इये देशीचे जे जे आहे ते'. 'स्वदेशी-विचार' या व्यापक संकल्पनेत आपल्या भाषा, भूषा, मूल्ये, उत्पादने या सर्वांचाच समावेश होतो. परंतु लेखनसीमेस्तव आज केवळ स्वदेशी-विदेशी उत्पादने हा पैलू मांडायचा प्रयत्न आहे.

आपल्या दैनंदिन वापरातील गोष्टी म्हणजे टूथपेस्ट, अंघोळीचा साबण, भांड्यांचा साबण, कपड्यांचा साबण, बिस्किटे, सौंदर्यप्रसाधने, चहा-कॉफी, शीतपेये वगैरे. या गोष्टी खरेदी करत असताना आपण नक्की कोणत्या गोष्टींचा तौलनिक विचार करून ठराविक उत्पादन ठरवतो? बारकाईने विचार केला तर असं दिसून येतं की २ गोष्टी प्रामुख्याने वस्तूंच्या निवडीमागे असतात- एक म्हणजे 'मला आवडतं म्हणून' आणि दुसरं म्हणजे 'जाहिरातीत दाखवतात म्हणून'. दुसरी गोष्ट सहजी कोणी मान्य करत नाही. परंतु उत्पादन निवडीमागे जाहिरातीचा मारा आणि आपल्या सुप्त मनामध्ये (sub conscious mind) त्या जाहिरातीचा असलेला परिणाम! टूथपेस्ट निवडीमागे बरेचदा त्यात असलेल्या कॅल्शिअम चा जाहिरातीत वापर केला जातो. कॅल्शिअम शरीरात गेल्याने हाडे व दात मजबूत होतात हे आपल्याला माहित असते. पण दातावर कॅल्शिअम घासले गेल्याने ते मजबूत होतात (?) हा विचार आपण करत नाही.

स्वदेशी वस्तूंची संकल्पना नक्की काय आहे? कोणते उत्पादन स्वदेशी? भारतात बनवले गेलेले ते स्वदेशी आणि आयात केलेले (imported) ते विदेशी अशी सामान्यतः समजूत असते. परंतु हा समज चुकीचा आहे. भारतात बनवली गेलेली वस्तूही विदेशी असू शकते. उदा. कोलगेट चा कारखाना भारतात आहे, त्यात कच्चा माल भारतातलाच वापरला जातो. भारतीय कामगार काम करतात आणि तयार माल हा भारतातच भारतीय व्यापारी वर्गातर्फे भारतीयांना विकला जातो. तरीही हे उत्पादन स्वदेशी नाही! याचं कारण 'ग्यानबाची मेख' ही 'ते उत्पादन विकले गेल्यानंतर त्यापासून होणारा फायदा हा कुठे जातो' ही आहे. . ह्यातून आपल्या कामगारांचा, व्यापारीवर्गाचा फायदा होतो ही गोष्ट खरी असली तरीही अंतिम नफा हा विदेशस्थित कोलगेट कंपनी ला होतो. आणि त्या देशाच्या अर्थव्यवस्थेत तो पैसा जातो. म्हणून हे उत्पादन विदेशी! विदेशी उत्पादन का घे‌ऊ नये, तर त्यावर आपण खर्च केलेल्या पैशाचा हिस्सा म्हणजेच पर्यायाने आपला पैसा परदेशात जातो. तेथील विकासकामांसाठी, संरक्षण सिद्धतेसाठी त्याचा वापर होणार म्हणून. एक युक्तिवाद असा केला जातो की, स्वदेशीचा अट्टाहास न धरता खरेदी केल्याने बाजारात उत्तम उत्पादन प्रस्तुत करण्याचा प्रयत्न उत्पादकाला करावा लागतो. ही गोष्ट खरी असली तरीही ही स्पर्धा स्वदेशी कंपन्यांमध्येही होऊ शकते. त्यासाठी विदेशी कंपनीची गरज नाही. आंतरराष्ट्रीय कंपन्या प्रचंड पैशाच्या जोरावर सुरुवातीची किंमत अत्यंत स्वस्त ठेऊन स्वदेशी कंपन्या विकत तरी घेतात किंवा बंद तरी पाडतात. उत्तम उदाहरण ’थम्स अप’ चे आहे. ’थम्स अप’ हे उत्पादन सुरुवातीला ’पार्ले जी’ चे होते. कोका कोलाने अत्यंत कमी किंमत ठेऊन पार्ले ला आपले उत्पादन बंद करावयास भाग पाडून ते शेवटी विकत घेतले. आणि आज कोका कोलाच्या बरोबर किंमतीने ते बाजारात आहे! त्यामुळे थोडा दूरदृष्टीचा विचार करून आपण विदेशी उत्पादनांचा मोह टाळावयास हवा. स्पर्धा स्वदेशी कंपन्यांतच होऊ द्या.

दुसरा युक्तिवाद हा सहाजिकच किंमतीबद्दल असतो. स्वदेशी उत्पादने महाग असतात हा जाणीवपूर्वक पसरविण्यात आलेला गैरसमज. आपल्या दैनंदिन वापरातील वस्तूंच्या किंमतींचा तौलनिक अभ्यास केला असता काय दिसते? विम बार च्या तुलनेत ओडोपिक बार स्वस्त आहे. आज कपडे धुलाईच्या साबणासाठी अनेक भारतीय पर्याय उपलब्ध आहेत. परंतु एरीअल, रिन, व्हील यांच्या प्रचारामुळे स्वदेशी उत्पादनेच पुढे येत नाहीत. किंबहुना कधीकधी असे लक्षात येते की त्या विविक्षित वस्तूला कंपनीच्या नावानेच ओळखले जाऊ लागले आहे. उदा. भांड्याचा साबण म्हणजेच विम बार! मग कोणत्याही कंपनीचा असो, कामकरी वर्ग त्यास विम बार म्हणूनच ओळखतो. म्हणजे 'ओडोपिक चा विम बार आणला आहे वाटतं!' अशी परिस्थिती होते.

स्वदेशी उत्पादनांच्या वरील
हे स्फुट बाबू गेनू , स्वा. सावरकर व गांधीजी यांच्याशिवाय पूर्ण करता येणार नाही. लोकांनी आपल्याकडील विदेशी वस्तू आणाव्यात, त्या अग्नीला समर्पित कराव्यात आणि पुन्हा विदेशी वस्तू वापरू नयेत हा 'विदेशी मालाच्या होळीमागील मुद्दा होता. त्यामुळे स्वातंत्र्यवीरांनी केलेली विदेशी मालाची होळी ही विदेशीचा 'विचार' जाळण्यासाठी आणि स्वदेशीला परिपुष्ट करण्यासाठी होती. गांधीजींनी सुद्धा स्वदेशी ला स्वराज चळवळीचे एक महत्वाचे अंग मानले होते. 'यंग इंडिया' मधले त्यांचे लेख अभ्यासपूर्ण आहेत. आणि त्यांच्या स्वदेशीवरील विचारांचे संकलन नवजीवन प्रकाशन प्रकाशित 'गांधी विचार दर्शन' या मालिकेतील 'स्वदेशी-विचार' या पुस्तकात पहावयास मिळते. परंतु बाबू गेनू ह्या तुलनेत तसा अप्रसिद्धच राहिला म्हणून त्याची कथा पुढे लिहीत आहे.

बाबू गेनूला जेव्हा समजले की, भारतातील कच्च्या मालाचा वापर करून तयार करून आणलेल्या विदेशी उत्पादनांचा साठा बंदरावर येत आहे, तेव्हाच त्याने तयारी केली. जेव्हा बंदरातून विदेशी मालाने भरलेले हे ट्रक बाहेर पडू लागले तेव्हा बाबू गेनुने ते अडवण्यासाठी त्याच्या मार्गात स्वतःला झोकून दिले. ट्रक थांबला कारण त्याचा चालक विठ्ठल धोंडू हा भारतीयच होता. थोडा ट्रक पुढे नेऊन भीती दाखविण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु क्रांतिकारकाला कसले मृत्यूचे भय! बाबू तसाच अविचल राहिला. विठ्ठल च्या बाजूला बसलेल्या इंग्रज सार्जंट ने ट्रक पुढे नेण्याचा आदेश दिला. परंतु विठ्ठल चे मन निबर नव्हते. त्याने साफ नकार दिला. त्या उद्दाम इंग्रज सत्तेच्या इमानी सेवकाने स्वतः ट्रक चा ताबा घेतला व माणुसकीला लाजवेल अशा कृत्याची नोंद इतिहासात झाली. ट्रक बाबुला चिरडून पुढे निघून गेला. बाबूने बलिदान केले. त्या बलिदानाची आठवण म्हणून एका रस्त्याला त्याचे नाव देण्यात आले आहे. परंतु त्याने ज्यासाठी बलिदान केले त्याचे काय? अजूनही स्वदेशी विचार जनमानसात पोहोचविण्याची गरज आहे.

रा.स्व.संघ प्रेरणेतून चालणारी 'स्वदेशी जागरण मंच' ( www.swadeshionline.in ), गांधी विचारधारेवर आधारित खादी ग्रामोद्योग यासारख्या संस्था या आजही स्वदेशी वस्तूंच्या प्रसारासाठी झटत आहेत. 'स्वदेशी जागरण मंच' या संस्थेने देशभर स्वदेशी उत्पादनांची ओळख व्हावी म्हणून 'स्वदेशी मेळे' आयोजित केले आहेत. शिवाय बाजारात गेल्यानंतर स्वदेशी वस्तू ओळखणे सोपे जावे म्हणून एक यादीच प्रसिद्ध केली आहे, जी घेऊन आपण खरेदीला जाऊ शकतो. ही यादी आपल्या उपयोगार्थ पुढे दिली आहे. आपला ई-मेल दिल्यास ही यादी मेलसुद्धा करता येईल, जेणेकरून आपण त्याची छापील प्रत काढू शकाल.

प्राथमिकता ही घरगुती उत्पादनांना द्यायला हवी. त्यानंतर मग लघु-उद्योग उदा. लिज्जत इ. व मग स्वदेशी कंपन्यांची उत्पादने असा क्रम ठेवावा. स्वदेशी चा वापर आणि विदेशीचा बहिष्कार म्हणजेच बळकट अर्थव्यवस्थेचा अविष्कार.


4 comments:

  1. Vikram,
    lekhat scan yaadi dene hi changli idea ahe.
    Aj antarrashtriy vyaparachi ji theory ahe tyat 'taulanik balabal (comparative advantage) ashi ek concept ahe. tyanusar konatyahi deshala jyaprakarache utpadan sarvadhik changalya prakare karata yeil te tyane adhikadhik karave ani any utpadane itar deshankadun liwawit.
    Swadeshi vicharpranali varil sankapalna vicharat ghet nahi. Deshat utpadan karane paravado kina n paravado, sarech ithe banavave. Je banavata yene shakya nasel te vaparuch naye ashi dharana Swadeshi mage ahe.
    Mulat Manavachya mulbhut pravrittibaddalache he 2 siddhant ahet ase mala vatate. Ekat Adhikadhik vapar kinva upabhog ase jari asale tari tyat vichar kinva tantrachi pragati adhik sambhavy ahe.
    Swadeshi manavi manababat ashi dharana thevate ki te upalabdh je ahe tyat santusht rahil.
    Hyatala kuthalach paryay abhiniveshane swikarane barobar nahi.
    Lekhat mhatalyapramane Daindin vaparatalya vastu swadeshi asavyat ha agarh barobar ahe. Pan to swadeshi ahet mhanun navhe, tar ashi utadane ji 'Shrama-saghan' (labor-intensive) ahet ani tyanche deshi utpadan he paradeshi utpadanapeksha swastach asanar mhanun.
    Asa agarh mobile, Computers, tantradyan hyat lavala tar Bharatatali It kinva Telecom pragati khuntel. Mag swadeshi ase sangate ka hi pragati khuntavich?
    Babu Genu che balidan hi kharach vegalich gosht ahe. Pan tyat bhavanecha bhag kiti ani buddhicha janivpurvak vapar kiti he koni nondavale ahe ka?
    Mala vatate ki manus nemaka kasa ahe hyababat swadeshi chalavalichi tatvik mandani mulat nahi ani asalich tar ti mala mahit nahi. Ti kalali tar swadeshi tatvadyan nit mandata yeil.
    Pan tarihi Daindin vaparatalya vastu ani jyanche utpadan tantr Shram saghan ahe asha vastu deshich ghyavat he matr pakke.

    ReplyDelete
  2. Swadeshi is very important and pertinent topic today. Thanks for writing on it. It is also important to present it as a valid alternative economic theory. This issue is not just about sentiments of Swadeshi, which it was some hundred years back. But also a sustainable model of socio-economics.

    Thanks once again for bringing this up.

    ReplyDelete
  3. सध्या बाजारात चिनी बनावटीच्या वस्तुंची रेलचेल आहे. कालच सौ. मोडकांनी "कारवा" नावाची एक वस्तू खरेदी केली आहे. ह्या वस्तुच्या खोक्यावर सदर वस्तू भारतात डिझाईन करून ती चीनमध्ये बनविल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. अशा वस्तू आपण भारतियांनी खरेदी कराव्या का ? आज अनेक बहुराष्ट्रीय कंपन्याहि असाच उद्योग करीत आहेत. कारण चीनमधील मजूर कमी मोबदल्यात वस्तुंची निर्मिती करतात. यावर आपले काय म्हणणे आहे ?

    ReplyDelete
  4. यात आणखी दोन गोष्टींचा उल्लेख करावासा वाटते. १. बाजीरात उपलब्ध असणारी बरीचशी चिनी बनावटीची उत्पादने तकलादू असतात. ती किती काऌ आपेक्षित काम करतील याचाहि भरवसा कोणीहि विक्रेता देत नाही. असे असूनहि ही उत्पादने प्रचंड प्रमाणावर खपतात ती केवळ त्यांच्या कमी किमतींमुळे. असे असूनहि "काय भुललासी वरलिया रंगा" हे चालूच आहे. यावर उपाय काय ? २. सध्या एल् ई डी दिवे त्यांना खूप कमी वीज लागते त्यामुळे सर्वत्र वापरले जात आहेत व ते रास्तहि आहे. पण बाजीरात कोणत्याहि नावाने विकले जाणारे हे दिवे फक्त व फक्त चिनी बनावटीचेच असतात. यालाहि कारण चिनी मजूर कमी मजुरीत काम करतात. त्यामुळेहि असा पैसा भारतातून बाहेर जात असतो. आपल्या प्रधानमंत्र्यांनी "मेक इन् इंडिया"ची जाहीर घोषणा करूनहि खूप दिवस उलटले असले तरी भारतीय उद्योजक म्हणावे तितक्या प्रमाणात आधुनिक वस्तुंच्या उत्पादनासाठी पुढे येतांना दिसत नाहीत. हे असे का होत आहे ? याचा विचार कोणी करीत असल्याचे व त्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न कोणी करीत असल्याचे दिसत नाही की ऐकिवातहि नाही. ही परिस्थिती कशी बदलायची ? याबद्दलहि विचार व्हावा व तो अनेकांच्या मते कसा घडविता येईल याची केवळ चर्चा करून थांबू नये असे मला वीटते. आपले विचार सांगाल का ?

    ReplyDelete